Select Page

“नव निर्मितीचा ध्यास तरुणांनी घेतला पाहिजे.” नवीन काय करता येईल याचा विचार तरुणांनी सतत केला पाहिजे असे प्रतिपादन मुंबई येथील अर्थ व वाणिज्य विषयातील तज्ञ सी.ए.अजित जोशी यांनी व्यक्त केले. स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयातील विविध अभ्यास मंडळ उद्घाटन समारंभाच्या प्रसंगी मुंबई येथील सी.ए.अजित जोशी उद्घाटक म्हणून उपस्थित होते. आपल्या विस्तारित भाषणात त्यांनी भारतातील कर प्रणालीवर आपले मत मांडले. अर्थ व वाणिज्य शाखेचे महत्व त्यांनी सांगितले. वाणिज्य शाखेत अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. तंत्रज्ञानाने जगाला जोडले आहे. तरुणांनी इंग्रजी येत नाही म्हणून घाबरून जाण्याचे कारण नाही. आपल्यात कौशल्य असले पाहिजे, आपण व्यापकदृष्टी ठेवली तर रोजगाराच्या असंख्य संधी दिसून येतील असे अजित जोशी म्हणाले. त्यांनी भारतातील कर प्रणाली जी.एस.टी. वर आपले विचार मांडले. घटनाकारांचे त्यांनी कौतुक केले. घटनाकारांनी अत्यंत योग्य पद्धतीने घटना तयार केली आहे. करप्रणालीच्या रचनेसंदर्भात घटनेत तरतुदी आहेत. वास्तविक कर हा एक सामाजिक करार आहे. जी.एस.टी.च्या संदर्भात राज्यांनी स्वखुशीने केंद्राला कर गोळा करण्याचा दिलेला अधिकार आहे, याच्या मोबदल्यात राज्यांना वाटा मिळणार आहे असे प्रतिपादन अजित जोशी यांनी केले. करांमधील समस्या टाळण्यासाठी जी.एस.टी.आलेला आहे. टी.डी.एस.व उत्पन्नावरील कर वेगळे नाहीत, एक देश, एक कर प्रणाली ही संकल्पना चुकीची आहे. भारतात कोणीही कमावले तर त्याला कर भरावाच लागतो असे अजित जोशी म्हणाले.

सामाजिकशास्त्र अभ्यास मंडळ, वाड्:मय मंडळ या अभ्यास मंडळांचे उद्घाटन देखील या प्रसंगी झाले. सामाजिकशास्त्र तसेच वाड्:मय मंडळाच्या कार्यासंदर्भात प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मा.दत्ता बाळ सराफ यांनी आपले विचार मांडले. अलीकडील काळात घडत असलेल्या घटनांसंदर्भात त्यांनी आपली भूमिका मांडली. सामाजिकशास्त्रांचे महत्व अधोरेखित करताना जीवन कसे जगावे हे सामाजिक शास्त्रेच शिकवतात, साहित्याच्या वाचनातून जीवन जगण्याचा मार्ग प्रशस्त होतो. विद्यार्थांनी या विषयांचा सखोल अभ्यास करावा असे आवाहन मा.दत्ता बाळ सराफ यांनी केले.

या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सहसचिव मेजर डॉ.शांतीनाथ बनसोडे यांनी केला. त्यांनी विद्यार्थांना हा विषय समजून घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य रमेश सोनवळकर यांनी केले तर सूत्रसंचालन समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.रमेश सोनटक्के यांनी केले. आभार प्रदर्शन सामाजिकशास्त्र अभ्यास मंडळाचे तसेच  लोकप्रशासन विभागाचे प्रमुख डॉ.पी.आर. थारकर यांनी केले.  या प्रसंगी अंबाजोगाई शहरातील सामाजिक कार्यकर्ते मा.अभिजित जोंधळे, उपप्राचार्य डॉ.प्रविण भोसले, महाविद्यालयातील IQAC विभागाचे प्रमुख प्रा.धनाजी आर्य,मराठी विभाग प्रमुख डॉ.बी.पी.रुद्देवाड, महाविद्यालयातीलप्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.