Select Page
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी दिवशी स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने सांस्कृतिक मंडळाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी, नाटककार अरविंद जगताप यांचे हस्ते झाले. यावेळी बोलताना श्री.जगताप यांनी, त्यांना “चला हवा येऊ द्या” या मालिकेत पत्रलेखन कसे सुचले? याबद्दल सांगितले. चित्रपट पटकथा आणि नाट्यलेखन व दिग्दर्शन निर्मिती याकडे वळताना नवी दृष्टी कशी ठेवावी यावर भाष्य करत असताना पारंपारिक शिक्षणाबरोबरच अभ्यासक्रमाच्या नव्या शाखा निवडूनही विद्यार्थांना व्यक्तिमत्व विकास साधता येतो, अलिकडे पुतळ्यांना महत्व प्राप्त झाले आहे मात्र विद्यार्थांनी महात्म्यांचे विचार आचरणात आणावेत मराठवाड्यातील कलावंतांचा गौरव करताना विद्यार्थांनी आव्हांनांना सामोरे जावे असे कवि अरविंद जगताप म्हणाले. स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयामधील नाट्यशास्त्र विभागातून विद्यार्थांना प्रशिक्षण घेता येणे ही संधी आहे. तिचा विद्यार्थांनी लाभ करून घ्यावा असे ते म्हणाले. यावेळी नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थांनी पाणी व्यवस्थापन विषयावरील मूकनाट्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
याच कार्यक्रमात नाट्य विभाग निर्मित अरविंद जगताप यांच्या परिचयाची प्रा.संपदा कुलकर्णी यांनी बनवलेली ध्वनीचित्रफितही प्रक्षेपित करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मेजर शांतीनाथ बनसोडे हे होते. आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थांनी लेखन कौशल्य आत्मसात करावे व त्याचा आदर्श अरविंद जगताप यांचेकडून घ्यावा असे सुचवत नाट्यशास्त्र विभागाच्या उपक्रमांचे कौतुक केले.
प्राचार्य रमेश सोनवळकर यांनी आपल्या प्रास्ताविकात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या कार्याची महती सांगून विद्यार्थांना सांस्कृतिक मंडळात सहभाग घेण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे संचालन प्रा.संपदा कुलकर्णी तर आभार प्रा.डी.एल.सोनवणे यांनी मानले. यावेळी महाविद्यालय परिसरात राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने प्रा.मेजर एस.पी.कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नाट्यशास्त्र विभागातील विद्यार्थी, प्रा.अजय चौधरी, प्रा.बाबासाहेब सरवदे, प्रा.ममता राठी, प्रा.एम.पी.देशपांडे, प्रा.सागर कुलकर्णी यांनी सहकार्य केले. 
या कार्यक्रमासाठी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार अड.व्ही.के.चौसाळकर,संस्थेचे सहसचिव श्री.गणपत व्यास, प्रा.एन.के.गोळेगावकर, श्री.अभिजीत जोंधळे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.