संतांची लक्षणे गांधीजीं मध्ये होती -मा.श्री.शामसुंदर सोन्नर

संतांची सर्व लक्षणे गांधीजींमध्ये होती, गांधीजी खरे संत होते. रंजल्या गांजल्यांची सेवा हे व्रत गांधीजींनी स्विकारले होते. राजकारणात राहूनही गांधीजींनी नि:स्वार्थवृत्ती अंगिकारली होती असे प्रतिपादन दैनिक प्रहारचे संपादक, शामसुंदर सोन्नर यांनी केले. 
येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या महात्मा गांधी अध्ययन केंद्राच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शामसुंदर सोन्नर बोलत होते. गांधीजींच्या व्यक्तिमत्वाचा आलेख मांडताना गांधीजी राजकीय संत होते असे मत त्यांनी व्यक्त केले. ते स्वच्छतेचे, अहिंसेचे दूत होते, विसाव्या शतकातील अग्रणी समाज सुधारक म्हणून त्यांची ओळख मान्य करावी लागते गांधीजी धार्मिक ही होते व नास्तिकही होते. गांधीजींना कोणत्याही चौकटीत बसविता येत नाही, गांधीजी भगवे कपडे घातले म्हणून संत म्हणता येत नाही, गांधीजी भगवे कपडे न वापरताही संत होते असे मत त्यांनी व्यक्त केले. आपल्या विस्तारित व्याख्यानात वारकरी संप्रदायातील संतांच्या कार्याप्रमाणेच महात्मा गांधींचे कार्य होते हे त्यांनी आवर्जून सांगितले. भारत मातेचे थोर सुपुत्र लाल बहादूर शास्त्रीच्या कार्याचे देखील या निमित्ताने स्मरण करण्यात आले. एक कर्तव्य कठोर, सक्षम पंतप्रधान ही शास्त्रीजींची ओळख कायम स्मरणात राहते. 
 या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश खुरसाळे यांनी केला. आजच्या असहिष्णूतेच्या काळात गांधीजींचे विचार महत्वाचे आहेत. महापुरुषांच्या विचारांचा सर्वांनी अंगिकार केला पाहिजे. आपल्या जीवनात ह्या विचारानुरूप आचरण केले पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पाहूण्यांच्या परिचय राष्ट्रीय छात्रसेना विभागाचे प्रमुख मेजर प्रा.एस.पी.कुलकर्णी यांनी केले तर प्रास्ताविक महात्मा गांधी अध्ययन केंद्राच्या संचालिका डॉ.शैलजा बरुरे यांनी केले. गांधीजींनी सत्याचा आग्रह धरला होता, गांधीजी स्वच्छतेला महत्व देत असत, गांधीजींच्या विचारांची आजही गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एन.सी.सी.विभागाचे शिवकुमार निर्मळे यांनी केले.  
या कार्यक्रमाला योगेश्वरी शिक्षण संस्थेचे कार्यकारी उपाध्यक्ष अड.शिवाजीराव कराड, तसेच संस्थेचे सचिव अड.उदयकुमार कामखेडकर तसेच सर्व सन्माननीय संचालक, योगेश्वरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जोशी, स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.एस.के.खिल्लारे, भाऊसाहेब चौसाळकर, योगेश्वरी तंत्रनिकेतनचे प्राचार्य रमण देशपांडे, मुख्याध्यापिका व्यास, जालनेकर मैडम, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी राष्ट्रीय छात्रसेनेचे स्वयंसेवक, पत्रकार, निमंत्रीत मोठ्या संख्येने उपस्थित होते.